https://www.facebook.com/SSdigimag
 

जंगलाचं दिलेलं वरदान

गार्सीनिया इंडिका चोइस, कोकम बटर (मुठीयाल) परंपरेची पुनःस्थापना

अनुवादक : मृणालिनी देसाई 

हा लेख इतर भाषांमध्ये / this article in 

अरक्षित

 

कोकणच्या घनदाट जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात सापडणारी, १२ वर्षाचा प्रदीर्घ वाढीनंतर फळ देणारी कोकमाची झाडे म्हणजे निसर्गाने दिलेलं एक अनमोल रत्न. कोकमात असणारी आंबट चव आणि विशिष्ट स्वादामुळे महाराष्ट्र,कोंकण विभाग,कर्नाटक,गुजरात,गोवा,

आसाम आणि केरळच्या व्यंजनात कोकम या फळाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. कोकमची साल (आमसूल) हे अनेक पाक कृतींमध्ये आंबट स्वादासाठी टाकले जाते. भारतात कोकम झाडाच्या विविध प्रजाती आहेत, मात्र त्यापैकी गार्सीनिया इंडिका चोइस ही विशिष्ट प्रजात केवळ पश्चिम घाटालगत असलेल्या सिंधुदुर्ग समुद्र किनारपट्टीवरील जंगलांमध्ये, रत्नागिरी जिल्हा आणि उत्तर गोव्यामध्येच आढळते. १६ जुलै २०१४ साली आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघ (IUCN) च्या मूल्यांकनानुसार या प्रजातीला ‘अरक्षित’ (vulnerable) असे सूचिबद्ध करण्यात आले.

DhamapurSatIMG 2020-12-19.png

अरबी समुद्र किनारपट्टीलगत वसलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर गाव. दक्षिणोत्तर दिशेला ५०० वर्ष जुना प्रसिद्ध धामापूर तलाव, उत्तरेला संथपणे वाहणारी कर्ली नदी आणि पश्चिम दिशेला काही अंतरावर असलेला अरबी समुद्र

स्त्रोत: गूगल उपग्रह प्रतिमा 

उपक्रमाची सुरुवात:

नाविन्यपूर्ण आणि यशस्वी उपक्रमांची प्रेरणा ही नेहमी एका सामान्य घरगुती समस्येतून निर्माण होते. धामापूर गावातील एक चिरेबंदी वडिलोपार्जित घर, जिथे राहणाऱ्या श्रीमती. मीनल या विविध पाककृतीत आमसूलचा वापर करतात. कोकमाच्या गरापासून सरबत आणि सालापासून आमसूल जे पाककृतीत आंबटपणासाठी वापरतात. कोकमचा सर्वसामान्य वापर हाच असतो. मात्र चार वर्षांपूर्वी जेव्हा श्रीमती. मीनल यांनी “कोकमाच्या बियांपासून काय करायचे” असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा अनेक विचार -विमर्श झाले आणि मोहम्मद उत्तरले - “या बियांपासून बटर बनवूया” कोकमाच्या बियांपासून बनणाऱ्या बटरचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कॅलरीज या कमी असतात आणि हे साधारण तापमानाला ला वितळत नाही. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा -सिंधुदुर्ग इथले हे एक पारंपारिक खाद्यविशेष.

AncestralHouse.jpg

गणित तज्ञ प्राध्यापक श्री. विष्णूपंत देसाई यांचे वडिलोपार्जित चिरेबंदी घर

कोकम बटर विषयी सांगताना मोहम्मद म्हणतात -

“पूर्वी सिंधुदुर्गात घरोघरी कोकम बटर बनवला जायचा. ज्याला स्थानिक भाषेत मुठीयाल किंवा मूठले म्हणतात. मालवण तालुक्यातील हिरव्यागार दाट जंगलांमध्ये भरपूर प्रमाणात कोकमाची झाडे पाहायला मिळतात. इतर झाडांप्रमाणे कोकम झाडाला जोपासावे लागत नाही किंवा ते लावले जात नाही. रानात उगवणाऱ्या आणि वाढणाऱ्य या कोकमाच्या झाडांना फळे यायला १२ वर्षांची पूर्ण वाढ लागते. एप्रिल -मे च्या दरम्यान कोकम फळांचा हंगाम सुरु होतो. कोकमाच्या बियांपासून तेल काढून आम्ही ते स्वयंपाकात वापरतो.”

दुर्लक्ष गुणधर्मांचे:

कोकम बियांपासून बटर बनवण्याची पद्धत श्रम -केंद्रित असल्याने व्यावसायिक व औद्योगिकतेच्या अर्थकारणाला त्यावर मात करणे सहज शक्य झाले. त्या आधारे तथाकथित ‘अविकसित’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशिया आणि आफ्रिकन समाजात ‘विकासाची’ संकलपना रुजवण्यात आली. पूर्वी काळी घरा-घरात बनवला जाणारा कोकम बटर हा इथल्या स्थानिक समृद्धीचा द्योतक होता. मात्र लवकरच कोकम बटर -मुठीयाल हे स्थानिक खाद्यपरंपरेतुन चलाखीने वगळण्यात आले. सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणारे औदयोगिक कारखाने २५ रुपये किलो या पडीक दराने कोकमाच्या बिया विकत घेऊ लागले.

KokumCover.jpg

या बियांपासून बनणारा बटर आज मॉइश्च्युरायझिंग क्रीम, साबणे, फेस लोशन्स, बॉडी लोशन्स अशा ब्रँडेड उत्पादकांमध्ये वापरला जातो. मोहम्मद यांच्या परिवारातील सदस्या मृणालिनी सांगतात -“स्थानिकांकडून पडीक भावात बिया घेऊन त्या मोठ्या औद्योगिक कारखान्यांना निर्यात केल्या जातात आणि त्याच पुनः आपल्या दारात फेशिअल क्रीम, मॉइश्च्युरायझिंग क्रीम व तत्सम ब्रँडेड उत्पादनाच्या स्वरूपात विक्रीस येतात”.

seeds Garcinia Indica Chois.jpeg

कोकमच्या बिया

मूल्य आणि भेसळ:

“औद्योगिकतेने कोकम बियांना कच्चा माल म्हणून आपल्या तावडीत घेणे सुरु केले तेव्हापासून स्थानिक लोक कोकम बटर आहारात वापरण्याची प्रथाच विसरून गेले. आधुनिक जगातल्या चंगळवादाशी जुळवून घेताना सिंधुदुर्गातील स्थानिक लोक आम्ही पूर्वी स्वयंपाकात हेच तेल वापरायचो हेच विसरून गेलीत” - स्यमंतक, जीवन शिक्षण विद्यापीठाचे संस्थापक सचिन देसाई उपक्रमाविषयी सांगताना म्हणाले.

पारंपरिक कोकम बटर चे आज मोठ्या कारखान्यातील यंत्र सामग्रींमध्ये स्थित्यंतर झाले. अवजड यंत्रांच्या आधारे कोकम बियांपासून तेल काढले जाते. तसेच उत्पादन वाढवण्यासाठी त्यात वनस्पती तूप टाकून भेसळ केली जाते. परिणामतः स्थानिक बाजारपेठेत ते कमी किमतीत विकल्या जाते. मात्र त्यामुळे कोकम बटर ची पौष्टिकता आणि गुणवत्ता खालावते.

प्रमाणबद्ध गुणवत्ता:

सर्जनशील कार्यकर्ते आणि समाज सुधारकांसाठी क्रांती ही कधीच निकराची नसते. कारण निकराची आक्रमकता उद्देशाला सुरुवातीलाच मारून टाकते. धामापूर गावातील जीवन शिक्षण विद्यापीठाचे सदस्य मोहम्मद, मृणालिनी, शोभा आणि विश्वास यांनी एकत्र येऊन सिंधुदुर्गातील पारंपारिक कोकम बटर बनवण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. गरमागरम चुलीवरच्या भाकरीवर कोकम बटर फिरवून आणि मीठ शिंपडून खाण्याची पद्धत कधी एकेकाळी अस्तित्वात होती, भूतकाळाच्या पानांमध्ये धूसर झालेल्या या कोकम बटर पद्धतीची सखोल माहिती आणि प्रक्रिया समजायला या तरुणांना चार वर्ष लागली.

गावकरी कोकमाच्या बिया रस्तावर पसरवतात ,ज्यामुळे जड वाहने त्यावरून जातात आणि बिया सहजपणे सोलून निघतात व ते कॉस्मेटिक कारखान्यांना विकले जातात. ही अस्वच्छ पद्धत या अभ्यासादरम्यान चौघांच्या लक्षात आली. हेच काम सुलभ आणि स्वच्छ रीतीने करता यावे यासाठी चौघांनी बेअरिंग लागलेले जाते (स्टोन ग्राईन्डर) मागवले. आपसूकच काम सोपे झाले. कोकम बटर बनवण्याच्या प्रक्रियेमधला अजून एक सुधारणेचा टप्पा चढण्यात आला तो म्हणजे दक्षिण भारतात वापरला जाणारा हेवी ड्युटी वेट ग्राईन्डर.

चार वर्षांच्या अखंड प्रयत्नांनी अखेर हळूहळू कोकम बटर बनवण्याच्या दुर्लक्षित प्रकियेवर प्रकाश पडला आणि ऑक्टोबर २०२० साली कोकम बटर प्रक्रिया पुनःस्थापित करण्यात आली. मृणालिनी म्हणते - “माझ्या पालकांसह आम्ही ६ जण या उपक्रमात सहभागी आहोत. प्रत्येक जण आपले वेगवेगळे कौशल्य वापरतात. उदा: माझे आई -वडील भन्नाट प्रॉडक्ट डिझाईनिंगच्या कल्पना, पॅकेजिंग इ. विषयात आपले कौशल्य देतात. आमच्या एकत्रित कुटुंबाला वर्षभर लागणारे कोकम बटर बनवतो आणि अंदाजे आतापर्यंत एका महिन्यात १० किलो या हिशोबाने आम्ही बटर आमच्या ऑनलाईन स्टोर द्वारे विकतो. आमचे प्रॉडक्ट्स संपूर्ण भारतात विक्रीस जातात.”

आणि आता ग्राहकांना महिना-महिना भर हा अस्सल कोकम बटर मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. फुलाचा सुगंध नेहमी पसरतच जातो आणि मग भृंग त्याकडे आकर्षित होतो तसेच चांगले काम देखील पसरत जाते आणि चांगल्या लोकांना सामावून घेते. कोकम बटर च्या या उत्तुंग यशाकडे बघून काळसे गावातील तरुण प्रथमेश काळसेकर या उपक्रमात सहभागी झाला. प्रथमेश हा नवयुवक शेती या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. त्यासोबतच धामापूर गावातील गृहिणी वर्षा सुतार देखील कोकम बटर उपक्रमात सामील झाली.

निसर्गाने कोकणाला दिलेल्या अनमोल रत्नाचे मूल्य त्यांना कळलेच आहे.

StoneGrinder+Vishwas.JPG

दगडी बेरिंग जात्यावर बिया भरडताना विश्वास

Marathi Supplement Info Box.jpg

यशस्वी उपक्रम:

धामापूर गावातल्या या एकत्रित कुटुंबाच्या या यशानंतर आता ते सिंधुदुर्गातल्या विविध बचत गट आणि इतर लघु व्यावसायिकांना कल्पक

उत्पादन संकल्पना त्यांची उत्कृष्ट पॅकिंग इ. विषयी मार्गदर्शन करत आहेत. हे सांगताना मोहम्मद म्हणतात - “निसर्गाने मुक्त हस्ताने दिलेल्या या समृद्धीचा फायदा नक्कीच घ्यायचा आहे, जसा आपल्या पूर्वजांनी घेतला. कोकम फळ हे मानवाचे पोषण आणि उपजीविका उत्तमोत्तम व्हावी यासाठी कोकणातल्या वनश्री ने दिलेले वरदान आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजेपुरता लागणारे वेगळे ठेवा आणि उरलेले विका. स्थानिक लोकांनी शुद्ध कोकम बटर बनवावे , पूर्वी काळी व्हायचा त्या प्रमाणेच आताही त्याचा आहारात समावेश करावा. याहून उत्तम काय ! जीवन शिक्षण विद्यापीठाच्या दृष्टीने हा उपक्रम स्थानिक गाव पातळीवर चालू व्हावा, एक वेळ अशी येईल कि कॉस्मेटिक कारखान्यांना विकायला बियाचं शिल्लक नसतील आणि तेच सर्वात मोठे यश असेल.”

जंगलाची महती:

दि गार्सीनिया इंडिका चोइस ही कोकमाची प्रजात कोकणातल्या समृद्ध जैव विविधता परंपरेचा भाग आहे. बहुसंख्य लोकं जेव्हा एकपिक पद्धतीवर केंद्रित होतात तेव्हा कोकमासारखे अनेक बहुगुणी प्रजाती असुरक्षित होतात. बहुमोल नैसर्गिक वारश्याचे जतन करणे महत्वाचे आहे. पर्यावरणीय दृष्टिकोन वगळता त्याचे स्थानिक लोकांना देखील अनेक फायदे आहेत. पडीक दरात विकल्या जाणाऱ्या या बियांना आज आहारातील पौष्टिक तेल म्हणून रूपांतरित केल्याने त्यांचे मूल्यवर्धन झाले आहे.

“विकास” या संकल्पनेचा पुनर्विचार:

स्यमंतक जीवन शिक्षण विद्यापीठाचे पूर्व विद्यार्थी आणि आता विश्वस्त मोहम्मद यांनी ग्रामीण विकासावर पदव्यूत्तर शिक्षण घेताना अनेक सामाजिक विषयांत पुढाकार घेतला. कुटीर उद्योग या संकल्पनेतून कोकम बटर चे उत्पादन हा त्यातलाच एक उपक्रम. या दरम्यान ५०० वर्ष जुन्या धामापूर तलावाचे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण आणि सखोल अभ्यास देखील करण्यात आला. यावेळी अनेक पर्यावरणीय उल्लंघनांविरुद्ध आवाज उठवून धामापूर तलावाला पर्यावरणीय धोक्यांपासून वाचवण्यात आले व येत आहे. दीर्घ संघर्षाच्या फलरूपी २०२० साली धामापूर तलावाला इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज (ICID) तर्फे वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर म्हणून घोषित करण्यात आले.

या कार्याचा परिणाम हळूहळू गावकऱ्यांवर पडू लागला. धामापूर तलावाकाठी राहणारा युवक मनोज धामापूरकर यांच्यावर देखील प्रभाव पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे धामापूर तलाव एक पाणथळ भूमी आहे. घोषित पाणथळ भूमीमध्ये पेट्रोल, डिझेल बोटी चालवणे बेकायदेशीर आहे. धामापूर तलावाचे पाणी मालवण शहरासह इतर १५ गावांना पिण्यासाठी पुरविले जाते. मनोज धामापूरकर यांना पिण्याच्या पाण्यात आपण चालवत असलेल्या पेट्रोल बोटीची गंभीरता व नुकसान कळू लागले व त्यांनी ते थांबवले. विविध नैसर्गिक उत्पादनाचे इको -स्टोर या शाश्वत आणि कल्पक रोजगाराकडे ते वळले. चिप्स आणि पेप्सी कोला च्या उपभोक्तावादी विळख्यात न फसता ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करणारे नाविन्यपूर्ण उत्पादन त्यांनी सुरु केले. कोविड ताळेबंदीच्या केवळ ७ दिवस आधी हा उपक्रम सुरु झाला आणि केवळ आठवड्याभरात २८,००० ची विक्री त्यांनी केली. स्यमंतक जीवन शिक्षण विद्यापीठातर्फे या उत्पादनांचे प्रशिक्षण मनोज यांना देण्यात आले.

उपक्रमाला भेट द्या. शोभा, विश्वास, मृणालिनी व कुटुंबीयांनी मिळून सुरु केलेला शाश्वत व्यवसाय जो प्रगतीच्या संकल्पना केवळ मानवकेंद्रित न ठेवता निसर्गाला देखील सामावून घेतो. जीवन शिक्षण विद्यापीठ सिंधुदुर्गच्या समृद्ध नैसर्गिक वारश्याशी भागीदारी करून आपली निराळी ओळख निर्माण करत आहे.

हा कल्पक उपाय इतरांसोबत सामायिक करा. कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये आपण दिलेले मत, विचार इतर वाचकांना बघण्यासाठी या पृष्ठाच्या शेवटी प्रविष्ट केले जातील.

Manoj Dhamapurkar.JPG

मनोज धामापूरकर त्यांच्या इको स्टोर मध्ये

Desais&SyUoLmembers.jpg

डावीकडून उजवीकडे -विश्वास, मोहम्मद, मृणालिनी, सचिन, मीनल आणि शोभा

आपले लेख प्रकाशित करण्यास उत्सुक आहात ?
 
sshumanityhelps@gmail.com 
इमेल करा